नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. तर, त्यांनी हा निर्णय बदलावा, यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच जण प्रयत्न करत आहेत. याच मागणीसाठी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने मंगळवारी सकाळी चक्क आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे हा प्रकार दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेरच घडला.
'राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्ष हवेत,' मागणीसाठी कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न - suicide
काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. त्यांनी हा निर्णय बदलावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने मंगळवारी सकाळी चक्क आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला.
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. तेच काँग्रेस अध्यक्षपदी रहावेत, यासाठी विविध तऱ्हेने त्यांची मनधरणी काँग्रेस सदस्यांकडून केली जात आहे. याच मागणीसाठी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. हा कार्यकर्ता काँग्रेस मुख्यालयाबाहेर आला व समोरच असलेल्या झाडाला स्वतःला लटकवून घेऊ लागला. हा प्रकार पाहून आसपासच्या काही नागरिकांनी त्याला खाली उतरवले. त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.
'राहुल गांधी राजीनामा परत घेणार नसतील तर, मी या ठिकाणीच आत्महत्या करेन,' असे या कार्यकर्त्याने म्हटले आहे. याआधीही राहुल गांधींची मनधरणी करण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न करण्यात आलेले आहेत. मात्र, राहुल बधलेले नाहीत.