चंदीगड : देशाच्या वायुसेनेची ताकद आज आणखी वाढली आहे. कारण वायुसेनेच्या ताफ्यात आज पाच नवी राफेल विमाने दाखल झाली आहेत. हरियाणाच्या अंबाला एअरबेसवर या विमानांचे काही वेळापूर्वी लँडिंग झाले.
फ्रान्सहून तब्बल सात हजार किलोमीटरचा प्रवास करत ही विमाने भारतात दाखल झाली आहेत. या पाच विमानांनी जेव्हा भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी दोन सुखोई विमानेही त्यांच्यासोबत होती. या दोन सुखोई विमानांनी पाच राफेल विमानांना एस्कोर्ट केले. जेव्हा ही विमाने अंबालाच्या एअर बेसवर दाखल झाली, तेव्हा हवाई दलाकडून या विमानांना वॉटर सॅल्युट देण्यात आला.
हवाई सेनेची ताकद वाढली; पाच महाशक्तीशाली 'राफेल' देशात दाखल! सोमवारी ही पाच विमाने फ्रान्सच्या बोरदू शहरातील मेरिग्नॅक एअरबेसहून निघाली होती. आज दुपारी ती अंबालाच्या एअर बेसवर पोहोचली आहेत. उड्डाण केल्यानंतर त्यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक थांबा घेतला होता. या विमानांमध्ये पाच विमाने ही ३ जणांना बसण्यासाठी आहेत तर २ विमानांत दोघे बसू शकतात. ही विमाने भारतीय हवाई दलाची तुकडी नंबर १७ गोल्डन अॅरो मध्ये सामील केली जातील.
सप्टेंबर २०१६ मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षमतांना बळकट करण्यासाठी भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल विमाने ५९,००० कोटींना खरेदी करण्याचा करार केला. भारतीय हवाई दलाने दोन्ही तळावर शेल्टर्स, हँगर्स आणि देखभाल सुविधांच्या विकासासाठी ४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. राफेल लढाऊ विमानाची पहिली तुकडी ही अंबाला हवाई दल तळावर तैनात केली जाईल. या भारतीय हवाई दलाचा तळ हा भारत-पाकिस्तान सीमेरेषेपासून २०० किमी अंतरावर आहे. राफेलची दुसरी तुकडी पश्चिम बंगालमध्ये हसिमारा इथे असेल. सर्व ३६ विमानांची डिलिवरी एप्रिल २०२२ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :घातक राफेल आणि इतर भारतीय लढाऊ विमाने.. वाचा या विमानांची वैशिष्ट्ये