पाटणा - दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आता बिहार विधानसभा निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी ही बिहार विधानसभा निवडणूक लढणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून तीने स्वतःची घोषणा केली असून प्लूरल्स असे तीने आपल्या पक्षाचे नाव जाहीर केले आहे.
बिहारच्या प्रगतीला वेग हवा असून बिहारमध्ये बदल होणे गरजेच आहे. कारण, बिहारच्या जनतेचा तो अधिकार आहे. तुम्ही प्लूरल्स पक्षासोबत जोडले जा आणि घाणेरड्या राजकारणाला नकार द्या, असे आवाहन तीने टि्वट्च्या माध्यमातून बिहारच्या लोकांना केले आहे. बिहारला योग्य ब्लू प्रिंटची गरज असून प्लूरल्सकडे तसा रोडमॅप आहे. जर मी निवडणूक जिंकले तर बिहार देशातील विकसित राज्य होईल, असेही तीने म्हटले आहे.