नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटन समांरभासाठी पाकिस्ताने नवज्योत सिंग सिद्धू यांना आमंत्रण दिले होते. या पार्श्वभूमीवर पंजाबमधील अमृतसर येथे पंतप्रधान इम्रान खान आणि नवज्योत सिंग सिद्धू यांचे पोस्टर्स लागले आहेत.
अमृतसर येथे लागलेल्या पोस्टर्समध्ये पंतप्रधान इम्रान खान आणि नवज्योत सिंग सिद्धू यांचा 'रियल हिरो' असा उल्लेख केला आहे. या पोस्टर्सवरून भाजपने सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे. सिद्धू हे पाकिस्तानच्या आयएसआयसाठी काम करतात, अशी टीका केली आहे. दरम्यान पोस्टर्स लागल्याच्या काही वेळानंतर लगेचच हटवण्यात आली आहेत.
पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन येत्या ९ नोव्हेंबरला करणार आहे. पाकिस्ताने या उद्घाटन समांरभासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांना आमंत्रण दिले आहे. त्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानला जाण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना परवानगी मागितली आहे.
'मला पाकिस्तानकडून कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटन समांरभात उपस्थिती लावण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. एक शीख म्हणून, या ऐतिहासिक प्रसंगी मला आमचे महान गुरु बाबा नानक यांना नमन करण्याची संधी मिळत आहे. हा माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे',असे सिद्धूने परराष्ट्र मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योत सिंग सिद्धू यांनी उपस्थिती लावली होती. तिथे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे फार मोठा गदारोळ माजला होता. भाजपसह इतर अनेक पक्षांनी सिद्धूवर टीका केली होती.