नवी दिल्ली -राजधानी दिल्लीमध्ये मागील काही वर्षांमध्ये प्रदूषण वाढले आहे. मागील वर्षी हिवाळ्यात प्रदुषणाने उच्चांकी पातळी गाठली होती. या प्रदुषणास पंजाब, हरियाणातील पिकेही काही प्रमाणात जबाबदार आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालायने एक समिती स्थापन केली होती. तिच्याकडे पंजाब आणि हरियाणा राज्याने कृती अहवाल सादर केला आहे.
पंजाब, हरियाणात हिवाळ्यात रब्बीचे गहू पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गव्हाची मळणी झाल्यानंतर जो टाकाऊ भाग म्हणजे, काड आणि भूसा उरतो, तो शेतकरी शेतातच पेटवून देतात. सर्रास शेतकरी मळणी झाल्यानंतर टाकाऊ भाग पेटऊन देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ही दोन्ही राज्ये दिल्लीच्या शेजारीच असल्याने परिसरात सगळीकडे धूर पसरतो. हिवाळ्यात तर त्याचा परिणाम आणखी होतो. दिल्लीतील दृष्यमानता कमालीची खालावते. सर्व शहरावर धुक्याची चादर पसरते.
या समस्येवर उपाय म्हणून पंजाब आणि हरियाणाने यांत्रिक पद्धीतने पिकाचा टाकाऊ भाग शेतातच गाडण्याचा उपाय पुढे आणला आहे. मशीन वापरून पिकाचा सर्व टाकाऊ भाग एकतर शेतात बारिक करून गाडण्यात येईल किंवा त्याचे गठ्ठे बनविण्यात येतील असा उपाय सुचवला आहे. ज्या शेतकऱ्यांना यंत्रे परवडणार नाही, त्यांना भाडेतत्वावर यंत्र देण्याचेही प्रस्तावित आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात हे उपाय वापरण्यात आले. मात्र, आता आणखी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत.