नवी दिल्ली-निर्मला सीतारामण यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह काँग्रेस पक्षावर टीका करताना केलेली वक्तव्ये देशाच्या अर्थमंत्रीपदाला शोभत नाहीत, असे प्रत्युत्तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिले. केंद्र सरकार आणि भाजपशासित राज्यामुंळे स्थलांतरित मजुरांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे,अशी टीका सिंग यांनी केली.
संकटकाळात स्थलांतरित मजुरांसाठी काँग्रेस पक्ष, काँग्रेसशासित राज्य दिवस रात्र काम करत आहेत. आमच्या पंजाब सरकारच्यावतीने 149 रेल्वेतून 1 लाख 78 हजार 909 मजूर त्यांच्या गावी परत गेले असून मजुरांना गावी पाठवण्यासाठी पंजाब सरकार काम करत आहे, असे अमरिंदर सिंग यांनी सांगितले. सोनिया गांधी पहिल्या दिवसापासून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांशी त्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करतात, असे प्रत्युत्तर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी निर्मला सीतारामण यांना दिले.
सीतारामण यांनी राहूल गांधी मजुरांना भेटले म्हणून केलेली टीका विनाकारण करण्यात आलेली असून एका ज्येष्ठ मंत्र्याने अशा पद्धतीची टीका करणे योग्य नाही असे कॅप्टन अमरिंदर म्हणाले. राहूल गांधी यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी भाजपशासित उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी प्रियंका गांधी यांनी व्यवस्था केलेल्या बसेसमधून आलेल्या मजुरांना राज्यात प्रवेश देण्यासाठी चर्चा करावी. दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सींमावर बसेस थांबल्या आहेत, असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वापासून ते कार्यकर्त्यापर्यंत सर्वजण या संकटकाळात स्थलांतरित मजुरांसाठी कार्यरत आहेत. सोनिया गांधी यांनीच काँग्रेसच्या राज्य युनिटसना स्थलांतरित मजुरांच्या तिकिटाचे पैसे भरायला सांगितले होते याची आठवण अमरिंदर सिंग यांनी सीतारामन यांना करुन दिली.स्थलांतरित मजुरांसाठी आणि गरजूंसाठी काँग्रेस कार्यालयात भोजन तयार करून ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काँगेस आमदार प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मजुरांना आणि गरजूना अन्न पुरवण्याचे काम पंजाब सरकारने केले आहे. यामुळे जोपर्यंत गावी परतण्याची सोय होत नव्हती तोपर्यंत मजुरांना पंजाबमध्येच राहणे पंसद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भाजपच्या मुख्यमंत्र्याप्रमाणे एकाही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांने मजुरांना राज्यात परत घेण्यास विरोध केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 30 मार्चला मजुरांना त्यांच्या गावी परतण्याची व्यवस्था करण्यासठी पत्र लिहल्याची आठवण अमरिंदर सिंग यांनी सीतारामन यांना करुन दिली. केंद्र सरकारचे पॅकेज मिळण्यापूर्वी आमच्या सरकारने 1 कोटी अन्नाचे पॅकेटस आणि 2 कोटी फुड पॅकेट वितरित केले आहेत, असे सिंग यांनी सागितले.