श्रीनगर - पुलवामामधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनावर दहशतवाद्यांनी अवंतीपुरा येथे हल्ला केला. या हल्ल्यात मृतांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. आज राष्ट्रीय तपास यंत्रणेचे १२ सदस्य या घटनेचा तपास करण्यासाठी शुक्रवारी जम्मू-काश्मीर येथे जाणार आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दुपारी सुमारे ३.१५ च्या सुमारास आत्मघातकी हल्ला झाला. आधी आयईडी स्फोट झाल्याची वृत्त होते. स्फोटानंतर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केल्याचेही समजले होते. पण आता निश्चित झाले आहे, की हा आत्मघातकी हल्ला आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिस प्रमुख दिलबागसिंग यांनी सांगितले, की हा दहशतवाद्यांनी घडवून आणलेला आत्मघातकी हल्ला आहे. जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. जीएनएस या स्थानिक वृत्त संस्थेला जैशच्या प्रवक्त्याने फोन करुन याची माहिती दिली आहे. परंतु, अद्याप प्रवक्त्याची ओळख पटलेली नाही.
आज दुपारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना लक्ष्य केले. एका दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधूंद गोळीबार केला. यात २० जवानांना वीरमरण आले आहे, तर १५ जवान जखमी झाले आहेत.
पुलवामा येथील महामार्गावरुन सीआरपीएफचा ताफा जात होता. या ताफ्यात जवळपास २५ बसेस होत्या. एकूण २५०० जवानांचा हा ताफा होता, असे स्थानिक वृत्तवाहिन्यांनी सांगितले आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी डीजी भटनागर यांच्याशी संपर्क साधून याबाबत चौकशी केली आहे.