उत्तर प्रदेश - सोनभद्र हत्याकांडावरून उत्तर प्रदेशच्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोनभद्र पीडितांची काँग्रेस नेत्यांनी भेट घेतल्यानंतर योगी सरकारला राज्यात गंभीर घटना घडल्याची जाणीव झाली, असा टोला त्यांनी लगावला आहे.
सोनभद्र हत्याकांडावरून प्रियंका गांधी यांचा योगीवर हल्लाबोल, म्हणाल्या.. - Yogi
सोनभद्र हत्याकांडावरून उत्तर प्रदेशच्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
"सोनभद्र हत्याकांडातील पीडितांची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि न्यायप्रेमी लोकांनी भेट घेतल्यानंतर राज्यातील सरकारला जाग आली आहे. आज त्यांनी ज्या घोषणा केल्या आहेत. त्यांची लवकरच अंमलबजावणी होईल अशी आशा आहे. आदिवासींना जमिनीची मालकी मिळेल आणि गावकऱ्यांना पुर्ण सुरक्षा मिळेल", असे टि्वट प्रियंका गांधी यांनी केले आहे.
प्रियंका गांधी यांनी शनिवारी सोनभद्रमधील पीडितांची भेट घेतली होती. यानंतर रविवारी योगी आदित्यनाथ यांनी पीडितांची भेट घेतली आहे. योगी यांनी जखमींना प्रत्येकी अडीच लाखांची तर, मृताच्या कुटुंबीयांना 18 लाखांची मदत जाहीर केली आहे. जमिनीच्या वादातून राज्यातील सोनभद्रमध्ये मंगळवारी १० जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हिंसाचारात १९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे.