महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसाममधील इंटरनेट बंदीचा मोदींना नाही पत्ता; ट्विट करत केले जनतेला शांत राहण्याचे आवाहन.. - Assam internet Ban

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, आसाममधील इंटरनेट सेवा कालपासून बंद करण्यात आली आहे. त्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून आसामच्या जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. आसाम राज्यातील इंटरनेट सेवा बंद केल्यानंतर, पंतप्रधान मोदी हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी इंटरनेटचाच आधार घेत आहेत, हा मोठा विरोधाभास म्हणता येईल.

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

By

Published : Dec 12, 2019, 11:34 AM IST

Updated : Dec 12, 2019, 4:31 PM IST

नवी दिल्ली - लोकसभेनंतर बुधवारी राज्यसभेमध्येदेखील नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) मंजूर झाले. विधेयकाविरोधात हजारो नागरिक आंदोलन करत आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून आसाममधील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. विधेयकामुळे आसामच्या आस्मितेला कुठलाच धक्का लागणार नाही, असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे. मात्र, कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे माहीत नसावे की, आसाममध्ये कालपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे हे ट्विट आसाममधील लोकांपर्यंत पोहचू शकणार नाही.

नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) मंजूर झाल्यामुळे आसाममधील नागरिकांनी काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुमचे हक्क, ओळख आणि आसामची सुंदर संस्कृती कोणीही नष्ट करत नसून बंधूभाव आणि आदरभावाची संस्कृती अधिकच वृद्धींगत होईल. आसामी लोकांच्या राजकीय, भाषिक, सांस्कृतिक हक्कांच्या घटनात्मक संरक्षणासाठी केंद्र सरकार आणि मी पूर्णपणे कटिबद्ध आहोत, अशा आशयाचे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे. मात्र, त्यांचा हा संदेश आसामच्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे इंटरनेट सेवाच उपलब्ध नाही. आसाममध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळपासून आसामच्या १० जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यात आता पंतप्रधान मोदी हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी इंटरनेटचाच आधार घेत आहेत, हा मोठा विरोधाभास म्हणता येईल.

काँग्रेसने केली टीका..

मोदीजी, तुमचा संदेश हा आसाममधील आमच्या बंधु-भगिनींपर्यंत पोहोचत नाहीये. कदाचित तुम्ही हे विसरला आहात, की आसाममधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, अशा आशयाचे ट्विट करत, काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

राज्यसभेमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक पारित झाले. १२५ विरूद्ध १०५ अशा फरकाने हे विधेयक मंजूर करण्यात आले. याआधी लोकसभेमध्येदेखील हे विधेयक पारित झाले आहे. या पार्श्वभूमीवर ईशान्य भारतामध्ये नागरिक आंदोलन करत आहेत. परिस्थिती बिघडली असून त्रिपुरामध्ये लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. तसेच गुवाहाटीमध्ये लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तर काही भागांत जाळपोळ झाली. नागरिकत्व विधेयक मागे घेतले जात नाही. तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

हेही वाचा : 'भाजपकडून संविधानाच्या मुळ गाभ्यावर हल्ला'

Last Updated : Dec 12, 2019, 4:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details