रांची- महाराष्ट्रात लागू झालेली राष्ट्रपती राजवट ही पूर्णपणे असंवैधानिक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप वृंदा करात यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ पूर्ण होण्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी केली, जी असंवैधानिक आहे, असे म्हणत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्या वृंदा यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच, केंद्र सरकारच्या सांगण्यावरून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आपल्या सत्तेचा गैरफायदा घेत भाजपने हे करून महाराष्ट्रातील जनतेवर, तसेच देशाच्या संविधानावरही वार केला आहे.
महाराष्ट्रात मतमोजणीनंतर युतीमधील बेबनावामुळे सत्तास्थापन करण्यात युती अयशस्वी ठरली. त्यानंतर भाजपनेही सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर, शिवसेनेला स्वतंत्रपणे सत्ता स्थापनेसाठी विचारणा करण्यात आली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने शिवसेनादेखील सत्ता स्थापन करू शकली नाही.