पाटना- राजकीय रणनीतिकार आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) पक्षाचे माजी नेते प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांवर टीका केली आहे. २००५ सालापासून बिहार दारिद्र्यात आहे. मात्र, नितीश कुमारांना प्रश्न विचारणारे कोणीही नाही. जेडीयू पक्ष आणि भाजपमधील आघाडीवरून मतभेद असल्याचे यावेळी त्यांनी मान्य केले. ज्यांना गांधीजींच्या विचारसरणीत विश्वास वाटतो, ते गोडसेला पाठिंबा देऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले.
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी कोणत्याही पक्षात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले. तसेच, बिहारमध्ये कोणत्याही पक्षासाठी काम करणार नसल्याचेही सांगितले. राज्यामध्ये 'बात बिहार की' या अभियानाला त्यांनी सुरूवात केली आहे. याद्वारे ते राज्यामध्ये नेतृत्व करू शकणाऱ्या तरुणांची फळी तयार करणार आहेत. यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर निशाणा साधला. दुसऱ्यांचे लांगूलचालन करून फक्त खुर्चीवर राहण्याचा प्रयत्न नितीश कुमार करत असल्याचे ते म्हणाले.
२००४ पासून नितीश कुमार भाजपबरोबर आहेत. नितीश कुमारांनीच नरेंद्र मोदींना बिहारमध्ये विरोध केला होता. तेच आज मोदींच्या मागे उभे आहेत. प्रश्न हा आहे की नितीश कुमार कोणत्या मूल्यांवर राजकारण करत आहेत. कन्हैया कुमार हे बिहारचे सुपुत्र असून राज्यासाठी काहीतरी करू इच्छितात. मी अशा लोकांबरोबर काम करणार आहे, जे बिहारचा विकास करतील.