नवी दिल्ली - जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांच्यासह पवन वर्मा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.. जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी ही माहिती दिली. प्रशांत किशोर हे संयुक्त जनता दलचे उपाध्यक्ष होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशांत किशोर यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात केली. तसेच त्यांनी मनमानी करत राष्ट्रीय अध्यक्षांच्या विरोधात अवमानकारक शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे त्यागी यांनी सांगितले.
संबधीत कारवाईनंतर लगेचच प्रशांत किशोर यांनी टि्वट केले आहे. किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उपहासात्मक शैलीत उत्तर दिले आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकवून ठेवल्याबद्ल शुभेच्छा, असे टि्वट त्यांनी केले आहे.
दरम्यान नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यासह अनेक मुद्यांवरून जनता दल युनायटेड (जदयू) मध्ये मतभेद निर्माण झाले होते. नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे नितीशकुमार यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. प्रशांत किशोर यांच्या भूमिकेवर जदयूमध्ये नाराजी होती. जदयूचे नेते अजय आलोक यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना थेट कोरोना विषाणूशी केली होती.