नवी दिल्ली - एआयएमए मॅनेजिंग अॅवॉर्डस् येथे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न प्रणव मुखर्जी उपस्थित होते. त्यांच्या मुख्य भाषणामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी, भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. ''काल्पनिक शौर्या'ने देशाचे भले होणार नाही, देशाच्या गरजा पूर्ण करणारा नेताच खरा,' असे मुखर्जी म्हणाले.
'देशातील अधिकाधिक लोक फोर्ब्जच्या यादीत येत आहेत, हे चांगले आहे. मात्र, देशातील मध्यम मिळकत असणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे,' असे ते म्हणाले. 'देशातील ६० टक्के पैसा १ टक्का लोकांकडे एकवटला आहे. ही चिंतेची बाब आहे. हे आकडे आपल्यासाठी ओझे आहेत. देशातील विकास अधिक सर्वसमावेशक आणि समान झाला पाहिजे. अजूनही अनेक लोकांना गरिबीतून बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी अजून मोठे अंतर कापावे लागणार आहे. मागे राहिलेल्या लोकांना विकासाच्या टप्प्यात आणणे आवश्यक आहे,' असे माजी राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले.'भारतात प्रत्येक ठिकाणी गुणवत्तापूर्ण आणि रास्त दरात आरोग्य सुविधांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. देशाला गौरवशाली बनवण्यासाठी आणखी युवकांची गरज आहे. देशाने संख्यात्मक बाजूकडे मोठी प्रगती केली आहे. मात्र, गुणवत्तेच्या बाबतीत अजून मोठे काम करण्याची गरज आहे,' असे प्रणव मुखर्जी म्हणाले.'आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषानुसार, भारत जगातील सातवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार २०१९-२० मध्ये मार्च २०१९ मध्ये संपणाऱ्या वित्तीय वर्षात भारतात सकल घरगुती उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर ७.६ टक्के राहण्याची शक्यता आहे,' असे ते म्हणाले.