नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी दिली. अभिजीत यांनी वडिलांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने मुखर्जी अद्याप व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले. अभिजीत मुखर्जी यांच्या ट्वीटला त्यांनी दुजोरा न देता प्रकृतीत मोठा सुधार नसल्याचे सांगितले आहे. त्यांना फुप्फुसात संसर्ग असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आपल्या वडिलांच्या प्रकृतीविषयी नियमितपणे लोकांना माहिती देणारे अभिजित यांनी प्रणव मुखर्जींची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले. तब्येत पूर्वपदावर येण्यासाठी आवश्यक असणारे घटक देखील नियंत्रणात आल्याचे ते म्हणाले.
'तुमच्या सर्व शुभेच्छा आणि डॉक्टरांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे माझे वडील आता स्थिर आहेत! त्यांचे महत्त्वपूर्ण पॅरामीटर्स नियंत्रणात आहेत; आणि तब्येतीत सुधारणेची सकारात्मक चिन्हे देखील आहेत. मी सर्वांना विनंती करतो, की त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा!' असे ट्वीट अभिजीत मुखर्जी यांनी केले.
कालपर्यंत अभिजीत यांनी माजी राष्ट्रपतींच्या प्रकृतीत मोठी सुधारणा होत नसल्याचे सांगितले होते. यावेळी ते दिल्लीतील आर्मी रिसर्च आणि रेफरल हॉस्पीटलमध्ये होते. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार प्रणव मुखर्जी यांना सतत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी यांची 10 ऑगस्टला मेंदुची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मेंदुजवळ गाठ आल्याने डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला होता. तसेच मुखर्जी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारन्टाइन होण्याचे सांगण्यात आले.