नवी दिल्ली - महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याला 'देशभक्त' म्हणाल्यामुळे साध्वी प्रज्ञा या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची देशाच्या संरक्षण सल्लागार समितीमध्ये निवड झाली होती. मात्र, या वक्तव्यानंतर आता त्यांची या समितीमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबतची माहिती दिली.
काल (बुधवार) लोकसभेमध्ये बोलताना भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याला 'देशभक्त' असे संबोधले होते. त्यावरून संसदेमध्ये बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याबाबत विचारले असता, आम्हाला जे सांगायचे होते ते आम्ही काल संसदेत सांगितले, असे म्हणत आणखी बोलणे टाळले. तर, ठाकूर जे बोलल्या ती भाजप आणि आरएसएसची मानसिकता आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. तसेच याबाबत मी काय बोलणार? मला माझा वेळ वाया घालवायचा नाही, असेही ते म्हणाले.
याप्रकरणी बोलताना भाजप कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. प्रज्ञा यांनी केलेले वक्तव्य हे निंदनीय आहे. भाजप कधीही अशा प्रकारच्या वक्तव्याला किंवा मानसिकतेला पाठिंबा देणार नाही, असे नड्डा म्हणाले. अशा प्रकारचे वक्तव्य केल्याबद्दल प्रज्ञा सिंह ठाकूर यांना देशाच्या संरक्षण सल्लागार समितीवरून काढून टाकण्यात येईल. तसेच या अधिवेशनात होणाऱ्या पक्षाच्या संसदीय बैठकांनाही त्यांना उपस्थित राहता येणार नाही, असेही नड्डा यांनी स्पष्ट केले.
प्रज्ञा ठाकूर यांची कोलांटउडी, म्हणाल्या मी तर उधम सिंग यांबाबत बोलत होते..
या सर्व प्रकारानंतर, प्रज्ञा ठाकूर यांनी ट्विट करत आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मी स्वातंत्र्य सैनिक उधम सिंग यांच्याबाबत बोलत होते, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला यांना अटक..