नवी दिल्ली -पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जूनला भारत आणि चीनच्या सैन्यात धुमश्चक्री झाली. यात २० भारतीय जवान शहीद झाले. ही घटना घडण्याच्या आधीपासूनच चीनने भारताबरोबरच्या सीमेवर आक्रमक धोरण स्वीकारले होते. परिस्थिती चिघळल्यानंतर भारतानेही चीनचा मुकाबला करण्यासाठी लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. चीनची आर्थिक मुस्कटदाबी करण्याबरोबरच लष्करी डावपेचही आखण्यात आले होते. १५ जूनच्या धुमश्चक्रीनंतर भारताने आपली युद्धनौका दक्षिण चिनी समुद्रात टेहाळणीसाठी पाठविल्याची माहिती आता पुढे आले आहे. याबाबत खात्रीशीर सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.
सीमेवरील वादानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव कमी करण्यासाठी अनेक बैठका झाल्या. त्या अजूनही सुरू आहेत. या बैठकीत भारतीय युद्धनौकेच्या दक्षिण चिनी समुद्रातील हालचालींवर चीनने आक्षेप घेतल्याची माहितीही पुढे आली आहे. संपूर्ण दक्षिण चीनवर दावा सांगणाऱ्या चीनला भारताच्या कृतीने चांगल्याच मिरच्या झोंबल्या होत्या. भारताबरोबर अमेरिकाही तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. भारतीय आणि अमेरिकी नौदल एकमेकांच्या संपर्कात होते, तसेच चीनच्या हालचालींवर बारकाईन लक्ष ठेवून होते.