डेहराडून- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंड पोलिसांनी मोठा निर्णय घेत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अफवा पसरवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर या कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. हल्दानी येथील बनभूलपुरा विभागातील घटना पाहता संपूर्ण राज्यात रासुका लावण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ही माहिती दिली.
लॉकडाऊन 2.0: उत्तराखंडमध्ये संपूर्ण राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू लॉकडाऊन 2.0 ते काटेकोरपणे पालन करण्यासाठी राज्यात केंद्रीय सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नैनिताल जिल्ह्यातील हल्दानी आणि रुद्रपूर येथेच रासुका लावण्यात आला असल्याचा गैरसमज निर्माण झाला आहे. मात्र, उत्तराखंड पोलीस मुख्यालयाने संपूर्ण राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
वारंवार लॉकडाऊनचे उल्लंघन, कोरोनाबद्दल सोशल मीडियावरील अफवांद्वारे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे, यामुळे रासुका लावण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पोलिसांनी सांगतिले.
राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केल्यानंतर त्या व्यक्तीस 12 महिन्यांसाठी तुरुंगात पाठवले जाते. याकाळात त्या प्रकरणाची सुनावणी होत नाही. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्यानंतर राज्य सरकारे रासुका लावतात.
दुसऱ्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी 50 गुन्हे दाखल करण्यात आले असून 285 जणांना अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळाता 15 एप्रिल पर्यंत 1584 गु्न्हे दाखल करण्यात आले तर 6394 जणांना अटक करण्यात आली. या काळात घराबाहेर पडणाऱ्या 17141 वाहनांना दंड करण्यात आला तर 4296 वाहने जप्त करण्यात आलीत. दंड स्वरुपात पोलिसांनी 81.91 लाख रुपये वसूल केले आहेत.