लखनऊ -कानपूर पोलिसांनी गुंड विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी 25 पथके तयारी केली आहेत. उत्तर प्रदेश राज्यात आणि शेजारील इतर राज्यातही आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, कानपूर पोलिसांनी विकास दुबेच्या एका साथीदाराला अटक केली आहे. गुडांच्या गोळीबारात कानपूरमध्ये आठ पोलीस शहीद झाले. या गोळीबारात दया शंकर अग्नीहोत्री(42) या गुंडाचाही समावेश होता. त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
मुख्य आरोपी विकास दुबे अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. कानपूर परिसरातून आज (रविवार) पहाटे 4.40 वाजता दुबेच्या साथीदाराला अटक करण्यात आली. त्याकडून बंदुक आणि गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी छापा मारला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी मारल्याने तो सापडला, अशी माहीती पोलीस अधिकारी दिनेश कुमार यांनी दिली. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
विकास दुबेला पोलीस घरी अटक करायला जाण्याआधीच त्याला पोलीस ठाण्यातील कोणीतरी माहिती पुरवली. त्यामुळे तो पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. पोलीस घरी पोहचताच त्याने गोळीबार केला. यामध्ये 8 पोलीस शहीद झाले, तर सात जण जखमी झाले.