नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात'मधून देशवासियांशी संवाद साधला. महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण मिळून प्लास्टिकच्या विरोधात जनांदोलन उभारून, त्यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करू, असे मोदी यावेळी म्हणाले. महात्मा गांधींच्या जन्माने एका नव्या युगाचा जन्म झाला होता. सत्यासोबत गांधींचे जितकं अतूट नातं राहिलंय तितकंच अतुट नातं लोकांची सेवा करण्यामध्येही राहिले असल्याचे मोदी म्हणाले.
जन्माष्टमीचा उल्लेख करताना मोदींनी भगवान श्री कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचं उदाहरण दिलं. कृष्ण जन्माष्टमी हा मोठा उत्सव असल्याचे मोदी म्हणाले. या उत्सवानंतर देशात आणखी एक मोठा उत्सव येत आहे तो म्हणजे २ ऑक्टोबरला महात्मा गांधींची १५० वी जयंती. सामान्य व्यक्ती श्रीकृष्णाच्या जीवनातून वर्तमानातील समस्यांवर उपाय शोधू शकतो. एकीकडे सुदर्शन चक्रधारी मोहन आहे, तर दुसरीकडे चरखाधारी मोहन (महात्मा गांधी) आहे. दोघांच्याही जीवनातून प्रेरणा मिळत असल्याचे मोदी म्हणाले.