दिल्ली- आज मी त्या सर्व वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहतो, ज्यांनी आपल्या रक्ताचे बलिदान देऊन कारगिलच्या शिखरावर तिरंगा फडकवला. तसेच या शूरवीरांना जन्म देणाऱ्या शूर मातांचाही मी आदर करतो. कारगिल विजय म्हणजे आमच्या मुला-मुलींच्या शौर्याचा विजय. हा भारताच्या सामर्थ्याचा आणि संयमाचा विजय होता. हा भारताच्या पावित्र्याचा आणि शिस्तीचा विजय होता. हा प्रत्येक भारतीयांच्या अपेक्षांचा विजय होता, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीमध्ये कारगिल युद्धाला 20 वर्षे पूर्ण झाल्यामुळे 'कारगिल विजय दिवस' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोदी बोलत होते.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, मागील ५ वर्षात आमचे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन (OROP) योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय अनेक दशकांपासून प्रलंबित होता, तो निर्णय सरकाने घेतला आहे. त्याबरोबर वीर जवानांच्या मुलांची शिष्यवृत्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे मोदी यांनी सांगितले.