नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई, नोएडा आणि कोलकाता येथील उच्च क्षमतेच्या कोरोना तपासणी सुविधा केंद्राचा शुभांरभ करणार आहेत. यामुळे देशातील कोरोना चाचण्या करण्याची क्षमता वाढणार आहे. यामुळे कोरोनाचे लवकर निदान होईल आणि वेळीच उपचार करण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे होईल.
मुंबई, नोएडा आणि कोलकाता कोरोना तपासणी केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.