नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचं घोषित केले आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी "बी कोरोना वॉरियर्स" ही मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेअंतर्गत व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना ते जिथे आहेत, तिथेच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज "बी कोरोना वॉरियर्स" चा एक व्हिडिओ आपल्या टि्वटर खात्यावरून शेअर केला आहे. मोदींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका मुलीने मुंबईत राहणाऱया आपल्या वडिलांना पत्र लिहिले असून ती आपल्या वडिलांना बाहेर न पडण्यास सांगत आहे.
'प्रिय बाबा, मी तुम्हाला अजिबात मीस करत नाहीये. आईसुद्धा करत नाहीये. तुम्हाला मुंबईमधून पळून येण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथेच रहा, जर आपण बाहेर पडलो तर कोरोना जिंकेल. आपल्याला कोरोनाला पराभूत करायचे आहे', असे ती आपल्या वडिलांना पत्राच्या माध्यमातून सांगत आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराबाहेर पडू नका, असे आवाहन केल्यानंतरही शेकडो नागरिक गरज नसताना अद्यापही रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे.
देशभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातशेच्या घरात पोहोचली आहे. देशात कोरोनाचे ७२४ रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या घडीला ६७७ भारतीय नागरिक तर ४७ विदेशी नागिरक असे एकूण ७२४ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर एकूण ४५ जण या आजारातून बरे झाले असून यामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.