संजय उवाच... मोदी, शाह, योगी हे आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय त्यांचे काम करत राहील. मात्र, राम मंदिराच्या निर्माणासाठी आपल्याकडे इतरही मार्ग आहेत. आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय कोण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि जनता हे आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहेत.
लखनौ - राज्यसभेचे खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी, शाह, योगी हे आमच्यासाठी 'सर्वोच्च न्यायालय' असल्याचे म्हटले आहे. राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्यासंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिराचे निर्माण करण्यात येईल, असे म्हटले आहे. 'हा निर्णय बहुमताने घेतला जाईल. १२५ कोटी लोकांच्या आवाजाला काहीच किंमत नाही का? सर्वोच्च न्यायालय त्यांचे काम करत राहील. मात्र, राम मंदिराच्या निर्माणासाठी आपल्याकडे इतरही मार्ग आहेत. आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय कोण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि जनता हे आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान राम मंदिर, सेक्शन ३७० आणि समान नागरी कायदा हे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. संपूर्ण देशाला यामध्ये रस असून लोकांनी याच मुद्द्यांवर मतदान केले,' असे राऊत म्हणाले. ते आज योगींची भेट घेणार आहेत.
'आता लवकरच राम मंदिर बांधण्यात येईल. हे होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. २०१९ मध्ये रालोआला प्रचंड बहुमत मिळाले. त्याच्या जोरावर आता राम मंदिराच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यापासून कोणतीही व्यक्ती किंवा कायदा अडवू शकणार नाही. याचसाठी लोकांनी आम्हाला पुन्हा सत्तेत बसवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे,' असे राऊत म्हणाले.
'देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर केवळ गृहमंत्री अमित शाह यांच्यातच काश्मीर प्रश्न सोडवण्याची ताकद आहे. अमित शाह देशाविषयी, हिंदुत्वाविषयी बोलतात. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याबद्दल कोणाचेही दुमत नाही,' असे राऊत यांनी म्हटले आहे.