नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोष्टींचे महत्त्व, भारतीय कुटुंबपद्धतीचे महत्त्व आणि कृषी विधेयकांचे फायदे याबाबत सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी गोष्टींचे, गोष्टी सांगण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कोरोनासारख्या महामारीने देशातील कुटुंबांना एकत्र वेळ घालवण्याची संधी उपलब्ध करुन दिली, या कुटुंबांना एकत्र आणले. मात्र, काही कुटुंबांचा आपल्या देशाच्या सांस्कृतिक मूल्यांशी असलेला संबंध तुटत चालला आहे. गोष्टी सांगण्यासारख्या छोट्याशा गोष्टीमुळेही ही कुटुंबे आपल्या संस्कृतीशी पुन्हा जोडली जाऊ शकतात.
आपण आता स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणार आहोत. त्यामुळे मी कथाकारांना विनंती करतो, की त्यांनी आपल्या कथांमध्ये ब्रिटिशकालीन काळाचाही समावेश करावा. १८५७ ते १९४७ दरम्यानच्या काळातील कथांमधून आपण पुढील पिढीला अनेक गोष्टी शिकवू शकू, असे मोदी म्हणाले.