महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मन की बात : लॉकडाऊन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली देशवासीयांची माफी

नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची माफी मागितली. तसेच लोकांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आणि कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचाही निर्धार व्यक्त केला.

PM MODI  FOCUS ON COVID-19 SITUATION IN 'MANN KI BAAT'
PM MODI FOCUS ON COVID-19 SITUATION IN 'MANN KI BAAT'

By

Published : Mar 29, 2020, 12:23 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांची माफी मागितली. तसेच लोकांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आणि कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचाही निर्धार व्यक्त केला.

'कोरोनावर मात करण्यासाठी देश बंदची घोषणा करावी लागली, त्यासाठी मी तुमच्या झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागतो. तुम्हा सगळ्यांना घरात बंद करून ठेवल्याने काही लोक माझ्यावर नाराज असतील. बंदमुळे तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागत असून हातावर पोट असलेल्या कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे, याची मला जाणीव आहे. मात्र, जगातील परिस्थिती पाहता, कोरोनावर मात करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला, असे पंतप्रधान म्हणाले.

ही जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई असून यात आपल्याला विजय प्राप्त करायच आहे. आजाराचा निपटारा सुरवातीलाच केला पाहिजे, नाहीतर रोगावर उपचार करणेही अवघड होऊन बसते. सर्व नागरिकांनी या विषाणूला नष्ट करण्यासाठी एकजूट होऊन संकल्प करावाच लागेल, असे मोदी म्हणाले.

लॉकडाऊनचे पालन करून तुम्ही इतरांची नाही. तर स्वतःचा बचाव करत आहात. स्वतःसह आपल्या परिवाराला वाचवायचे आहे. आता पुढचे अनेक दिवस याच धैर्याने लक्ष्मणरेषेचे पालन करायचंच आहे, असे मोदी म्हणाले.

'आर्योग्यम परं भाग्यम, स्वास्थ्यं सर्वार्थ साधनं' अर्थात आरोग्य हेच सर्वात मोठं भाग्य आहे. जगातल्या सर्व सुखांचे साधन, आरोग्यच आहे. अशामध्ये नियम तोडणारे आपल्या जीवाशी छेडछाड करत आहेत. काही जणांना परिस्थितीचे गांर्भींय लक्षात येत नाही. जर तुम्ही लॉकडाऊनचे नियम तोडाल तर, विषाणूपासून वाचणे कठीण होईल, असेही मोदी म्हणाले.

कोरोनाविरोधात अनेक जण लढा देत आहेत. त्यामध्ये परिचारिका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर घराबाहेर राहून कोरोनाला पराभूत करत आहेत. त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यायची आहे, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात ते जनतेला संबोधित करतात. दरम्यान देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९७९ झाली आहे. यामध्ये ९३१ भारतीय तर ४८ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. तसेच यामुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details