मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये बिबट्यांची संख्या वाढल्याचे सांगितले. बिबट्यांची संख्या वाढवून भारताने संपूर्ण जगाला एक मार्ग दाखवल्याचे मोदी म्हणाले. देशात चार वर्षात बिबट्यांची संख्या 12 हजारांवर गेली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशातील बिबट्यांच्या संख्येचा एक अहवाल जाहीर केला आहे.
2014 ते 18 दरम्यान भारतातील बिबट्यांची संख्या 60 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. 2014 मध्ये देशात बिबट्यांची संख्या सुमारे 7 हजार 900 होती. तर 2019 मध्ये ही संख्या वाढून 12 हजार 852 झाली. देशातील बर्याच राज्यांत, विशेषत: मध्य भारतात, बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अव्वल स्थानी आहेत. ही एक मोठी कामगिरी आहे, असे मोदी म्हणाले.
अनेक वर्षांपासून जगभरात बिबट्याला अनेक धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. जगभरातील त्यांचे वास्तव्य धोक्यात आले होते. अशा वेळी बिबट्यांची संख्या सातत्याने वाढवून भारताने संपूर्ण जगाला एक मार्ग दाखविला आहे. सरकारसोबत वनधिकारी आणि अनेक संस्था, वृक्ष आणि वन्यजीव यांच्या संरक्षणामध्ये सहभागी झाल्याने हे शक्य झाले आहे. हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत, असे मोदी म्हणाले.