रांची - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून झारखंडमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. नागरिकत्व कायदा मंजूर झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. जे काम पाकिस्तान कायम करत आला आहे, ते काम आता काँग्रेस करायला लागला आहे, असे मोदी म्हणाले. दुमका येथे आयोजित रॅलीमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी झारखंडमध्ये भाजपने केलेल्या विकास कामांचीही माहीती दिली.
ज्या पद्धतीने काँग्रेस देशात अराजकता पसरवत आहे. त्यावरून असे दिसून येते की नागरिकत्व दुरुस्ती कायदा एक हजार टक्के बरोबर आणि देशहितामध्ये आहे. आंदोलनात जे आग लावत आहेत, ते त्यांच्या कपड्यांवरूनही ओळखू येत आहेत. देशाचे कल्याण करण्याची आशा काँग्रेसमध्ये राहीली नाही. हे फक्त आपल्या परिवाराचा विचार करत आहेत, असे मोदी म्हणाले.
हेही वाचा -'नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करताना अडचण येणार नाही, काँग्रेस पक्ष आंदोलनाचा फायदा उचलतोय'
जगातील विविध आठ देशांच्या भारतीय दुतावासाबाहेर ओव्हरसीज काँग्रेसने आंदोलन केले. त्यावरूनही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. जे काम आत्तापर्यंत पाकिस्तान करत होता, ते आता काँग्रेसने सुरू केले आहे. जेव्हा रामजन्मभूमी आणि कलम ३७० चा निर्णय झाला तेव्हा पाकिस्तानने परदेशातील भारतीय दुतावासाबाहेर आंदोलने केले, हिंसाही घडवून आणली. पाकिस्तान जगामध्ये भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, आता काँग्रेसनेही हेच काम सुरू केले आहे, असे मोदी म्हणाले.
आसामच्या जनतेचे मी आभार मानतो, त्यांनी हिंसा करणाऱयांपासून स्वत:ला दुर ठेवले. शांततेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न आसाम आणि ईशान्येकडील राज्ये करत आहेत. पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातील पीडित अल्पसंख्यकांना आता सन्मानाने जगता येईल. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने हा कायदा मंजूर केला.