नवी दिल्ली - राजधानीतील विधनासभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आज (मंगळवार) पंतप्रधान मोदींच्या सभेचे आयोजन द्वारका येथे करण्यात आले होते. यावेळी मोदींनी भाजपने केलेल्या विकास कामांची माहिती दिली. मतदानाच्या ४ दिवस आधी दिल्लीमध्ये भाजपच्या बाजूने वातावरण असल्याचे मोदी म्हणाले. दिल्लीला दिशा देणाऱ्या सरकारची गरज असून दोष देणाऱ्या राजकारणाची गरज नाही, असे ते म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात असल्याने भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. 'सौभाग्य योजनेनुसार आम्ही जेवढे वीज कनेक्शन दिले, ती संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून आम्ही जेवढी घरे बांधली, ते श्रीलंकेच्या एकून लोकसंख्येपक्षा जास्त आहेत. याच गतीने काम झाले तर दिल्लीच्या अनेक समस्या सुटतील. याच कामांमुळे लोकसभा निवडणुकांत लोकांनी भाजपवर विश्वास दाखवला. या विश्वासामुळे आज दिल्लीकर छाती ठोकून म्हणत आहेत, की देश बदलला आता दिल्ली बदलायची आहे', असे मोदी म्हणाले.
'मागील ५ वर्षात केंद्र सरकारने ज्या गतीने काम केले ते अभूतपूर्व आहे. स्वातंत्र्यानंतर इतक्या जलद गतीने कधीही काम झाले नाही. आज आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जितक्या लोकांना मोफत उपचार मिळत आहेत, ही संख्या अमेरिका आणि कॅनडा देशांच्या लोकसंख्ये एवढी आहे. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत केंद्र सरकारने जेवढे शौचालये बांधले आहेत, ते इजिप्त देशाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहेत. तसेत उज्वला योजनेअंतर्गत जेवढ्या गरीब महिलांना गॅस कनेक्शन दिले आहेत, ते जर्मनीच्या लोकसंख्ये एवढे आहेत, असे मोदी म्हणाले.
केंद्र सरकारच्या अनेक योजना लागू करण्यास दिल्ली सरकारने विरोध केला आहे. दिल्लीकरांनी काय गुन्हा केलाय? ज्यामुळे त्यांना आयुष्यमान योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत नाहीत. दिल्लीत असे सरकार आहे, ज्यांना लोकांच्या जीवाची पर्वा नाही. दिल्लीतील बेघर लोकांचा काय गुन्हा आहे? ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळत नाहीत, असे म्हणत त्यांनी आपवर टीका केली.
दिल्लीला बुचकाळ्यात टाकणारी नाही, तर अडचणींतून सोडवणाऱ्या राजकारणाची गरज आहे. दिल्लीकरांच्या विकासाच्या योजना अडवणारा नाही, तर 'सबका साथ सबका विकास'वर विश्वास असणाऱ्या नेतृत्त्वाची गरज आहे. दिल्लीला दोष देणारा नाही, तर दिशा देणारे सरकार हवे आहे, दिल्लीला रस्ते अडवणारी आणि द्वेष पसरवणाऱ्या राजकारणापासून सुटका हवी असल्याचे मोदी म्हणाले.