पाटणा - भाजप पुन्हा सत्तेत आली तर तुकडे-तुकडे गँगचे तुकडे होणार, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या महाआघाडीला लगावला आहे. ते बिहारच्या भागलपूर येथे निवडणूक प्रचारसभेत बोलत. आपण पुन्हा सत्तेत आलो तर सुरक्षा करारातील दलाली पूर्णपणे बंद होणार, असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केला.
बिहारच्या भागलपूर येथे १८ एप्रिलला निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आज मोदी यांची जनसभा होती. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांना धारेवर धरले. आज बिहारमध्ये ४ लोकसभा मतदान क्षेत्रासाठी मतदान होत आहे. राफेल करारावरून पंतप्रधान मोदींवर विरोधी पक्ष टीका करत आहेत. त्यातच मोदी यांनी सुरक्षा करारातील दलाली बंद करण्याचे म्हटल्यानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
भाजप जर पुन्हा सत्तेत आले तर भ्रष्टाचार करणाऱ्यांचे दुकान पूर्णपणे बंद होणार. वंशवादी राजकारणही बंद होणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गरिबी हटवण्याच्या नावावर लोकांना ठगवले जात आहे. या ठगणाऱ्यांचेही दुकान बंद होईल, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
एकीकडे आम्ही ५ वर्षामध्ये विकासाचे काम केल्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. तर, दुसरीकडे यांना भीती आहे. असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. आम्ही आमच्या संकल्प पत्रामध्ये व्यापाऱ्यांसाठी राष्ट्रीय व्यापारी आयोग बनवण्याची हमी दिलेली आहे. पहिल्यांदा देशात व्यापाऱ्यासाठी विचार केले जात आहे, असे मोदींनी ठासून सांगितले.
बिहार येथे दुसऱ्या टप्प्यामध्ये ५ जागांसाठी १८ एप्रिलला मतदान होणार आहे. येथे भाजपने स्थानिक पक्षांशी आघाडी केलेली आहे. त्यामध्ये जनता दल युनाईटेड आणि राम विलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचा समावेश आहे.