नवी दिल्ली - विविध कार्यक्रमांच्या माध्यमांतून देशभरात आज जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला दिनानिमित्त आपले टि्वटर खाते 7 महिलांना चालवण्यास दिले आहे. आज सकाळापासून या 7 महिला मोदींच्या खात्यावरून आपल्या जीवनातील आठवणी आणि विशेष कथा शेअर करत आहेत.
महिला शक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतो. आज महिला दिनानिमित्त 7 महिला माझे खाते सांभाळतील आणि त्यांचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करतील. देशातील सर्व महिलांनी विविध क्षेत्रामध्ये यश प्राप्त केले आहे. त्यांचा संघर्ष आणि महत्वकांक्षा लोकांना प्रेरीत करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टि्वट करून म्हटले आहे.
नरेंद्र मोदींच्या टि्वटर खात्यावरून स्नेहा मोहनदास, आरिफा, मालविका, कल्पना रमेश, विजया पवार, कलावती देवी, वीणा देवी यांनी आपला जीवनप्रवास शेअर केला आहे. स्नेहा मोहनदास ह्या बेघरांना खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या फूडबँक इंडियाच्या संस्थापिका आहेत.
मालविका अय्यर यांनी आपली कथा सांगितली. '13 वर्षांची असताना एका बसमधील स्फोटात मी माझे दोन्ही हात गमावले. मात्र, तरी मी थांबले नाही आणि प्रवास सुरूच ठेवला. प्रत्येक महिलेने आपल्या मर्यादा विसरून जायला हव्यात आणि विश्वासाने पुढे जावे, असा संदेश त्यांनी दिला.
कल्पना रमेश यांनी आपण जल संरक्षणासाठी कार्य करत असल्याचे सांगितले.