नवी दिल्ली - केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अर्थशास्त्रातील नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार जरी मिळाला असला तरी देशाने त्यांचे विचार नाकारले आहेत, असे गोयल एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले.
मला अभिमान आहे की, नोबेल पारितोषीक एका भारतीयाला मिळाले. त्यांनी काँग्रेसला न्याय योजना तयार करण्यासाठी मदत केली होती. जी योजना भारतीय जनतेन पाहिलीही आणि नाकारली ही. त्यांच्याविषयी लोकांना माहिती आहे की, ते डाव्या विचारधारेला समर्थन करतात, असे गोयल म्हणाले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. त्यांनी आपल्या अपयशावर विचार करायला हवा. ते एक मजबूत अर्थव्यवस्था निर्माण करण्यात अपयशी का झाले. भारतीय जनतेला ते इमानदार सरकार देऊ का नाही शकले. या सर्व गोष्टींवर त्यांनी चिंतन करायला हवे, असे गोयल यांनी म्हटले आहे.
अभिजित यांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यामधील 'न्याय' ही योजना तयार करताना मदत केली होती. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात एकूण ५ सर्वात महत्त्वाच्या गोष्टींवर भर देण्यात आला होता. त्यात न्याय ही सर्वात पहिली आणि मध्यवर्ती संकल्पना असल्याचे राहुल गांधी यांनी घोषित केले होते.