महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपला इम्रान खानचा पाठिंबा ? मोदी जिंकले तर, पाकमध्ये जल्लोष कसा - केजरीवालांचा सवाल - india

'भाजप सरकारला पाकिस्तानचा पाठिंबा का मिळत आहे? मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर पाकला काय फायदा होणार आहे,' असे प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत. तसेच, इम्रान यांचे अजब तर्क आणि भाजपला पाठिंबा खरा आहे का, असाही प्रश्न विचारला जात आहेच.

भाजपला इम्रान खानचा पाठिंबा ?

By

Published : Apr 10, 2019, 3:08 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत यावेत, अशी आशा व्यक्त केल्याचे वृत्त पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांनी आणि इतर काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. पुन्हा भाजप सरकार आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असे इम्रान यांनी म्हटल्याचे यात सांगण्यात आले आहे. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

'भाजप सरकारला पाकिस्तानचा पाठिंबा का मिळत आहे? मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर पाकला काय फायदा होणार आहे,' असे प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत. 'त्याच वेळी इम्रान खान यांनी सध्या विरोधी बाकावर असणारा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास भारत-पाक दरम्यान चर्चा होणे अशक्य असल्याचेही म्हटले आहे. इतर राजकीय पक्षांकडून टीका होईल, या भीतीने काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. हे काय गौडबंगाल आहे,' असे केजरीवाल यांनी विचारले आहे.गुरुवारपासून भारतात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. ९१ जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. 'इम्रान खान यांनी आपल्याला दोन नरेंद्र मोदी पहायला मिळणार असल्याचे म्हटले आहे. एक निवडणुकीआधीचे आणि दुसरे निवडणुकीनंतरचे.' इम्रान यांचे हे विधान अत्यंत भयंकर आहे.महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान हुतात्मा झाल्यानंतर भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप भारताने केला होता. यानंतर पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करत भारताचे लढाऊ विमान पाडले होते. भारतीय वैमानिक अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेऊन नंतर सुटका केली होती. पाकिस्तानच्या या वारंवार आगळीकी करण्यामुळे भारताकडून पाकला शांततेवर कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असे बजावले होते. तसेच, पाकिस्तानची कोंडीही करण्यास सुरुवात केली होती. इतक्या घडामोडींनंतरही पाक पंतप्रधान इम्रान खान भाजप सरकार आले तरच शांततेवर चर्चा होऊ शकते, असे म्हणत असतील, तर ही आश्चर्याची बाब ठरते.इम्रान यांनी भाजप पुन्हा सत्तेत आल्यास चर्चेला प्राधान्य दिले जाईल असे म्हटले आहे. काँग्रेस विरोधकांकडून आपण घेरले जाऊ या भीतीने चर्चा करण्यास टाळेल, असे आणखी एक आश्चर्यकारक विधान त्यांनी केले आहे. त्याच्याही पुढे त्यांनी भारतावर हल्ला करण्याचे वेगळेच कारण पुढे केले आहे. ‘भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर त्यांना उत्तर देणे गरजेचे होते. आम्ही उत्तर दिले नसते तर लोकांकडून आमच्यावर प्रचंड टीका झाली असती. भारताला उत्तर दिले नसते तर कोणतेही सरकार पाकिस्तानात टिकू शकत नाही,’ अशी विधाने इम्रान खान यांनी एकामागोमाग एक केली आहेत. भाजपला पाठिंबा व्यक्त करताना इम्रान यांनी अजब आणि चमत्कारिक वक्तव्ये केली आहेत.इम्रान यांना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरविषयी विचारले असता, त्यांनी तो भूमिगत किंवा फरार झाला असल्याचे सांगितले आहे. त्याचा कुठेही पत्ता नसून तो गायब असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, तो सध्या जैशचे नेतृत्व करत नसल्याचेही ते म्हणाले.
इम्रान यांच्या वक्तव्यांनंतर भाजप विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. आपचे आणखी एक नेते संजय सिंह यांनी भाजप आणि मोदींनी निवडणूक जिंकली, तर पाकला आनंद होण्याचे काय कारण आहे, असा सवाल केला आहे. 'इम्रान खान यांनी भाजपला निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी पुलवामा हल्ला घडवून आणला का? आणि त्यामुळेच मोदींनी 'पाकिस्तान डे'ला शुभेच्छा दिल्या काय? त्यावेळी दोघांमध्ये काय समझोता झाला,' असेही त्यांनी विचारले आहे. इम्रान यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि मोदींवर विविध माध्यमांतून टीका होत आहे. मात्र, इम्रान यांचे अजब तर्क आणि भाजपला पाठिंबा खरा आहे का, असाही प्रश्न विचारला जात आहेच.

ABOUT THE AUTHOR

...view details