नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सकाळी राफेल कराराविरोधात संसदेबाहेर विरोध प्रदर्शन केले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सरकारविरोधात निदर्शने करत कागदी विमानेदेखील हवेत उडवली. कॅगचा अहवाल संसदेत सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी हे विरोध प्रदर्शन केले.
कॅगचा अहवाल सादर होण्यापूर्वीच काँग्रेसची निदर्शन, संसदेबाहेर उडवली 'कागदी राफेल'
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सरकारविरोधात निदर्शने करत कागदी विमानेदेखील हवेत उडवली. कॅगचा अहवाल संसदेत सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी हे विरोध प्रदर्शन केले.
राहुल गांधींनी कॅगला चौकीदार ऑडिटर जनरल रिपोर्ट म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती. या अहवालात सरकारने राफेलची किंमत ही गुप्त असल्याचे कारण देत त्याबद्दलची माहिती देणे टाळले आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदी हे अनिल अंबांनींचे मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. मोदींनी अंबांनीना गुप्त माहिती दिल्यानेच ते राफेल कराराच्या १० दिवस अगोदर फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांना जाऊन भेटले. याबद्दल मोदींवर भ्रष्टाचारच नव्हे तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात डांबा, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.