नवी दिल्ली - पाकिस्तानने बुधवारी संध्याकाळी गझनवी नामक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची माहिती लष्कर प्रवक्ते आसिफ गफूर यांनी दिली आहे. या क्षेपणास्त्राची क्षमता २९० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची असून, कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रकारात याचा समावेश होतो. काश्मीर मुद्द्यावरून भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्याने पाकिस्तानने क्षेपणास्त्राची चाचणी करून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.
दोन्ही देशांमध्ये युध्दजन्य परिस्थिती असल्याचा आभास पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण केला जात आहे. याचाच भाग म्हणून क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली. भारताकडे या प्रकारातील पृथ्वी, धनुष, सागरिका, प्रहार व अग्नी अशी कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत.