श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील तंगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारामध्ये २ भारतीय सैनिक हुतात्मा झाले आहेत. त्यानंतर भारतीय लष्कराने सीमेपलीकडील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. निलम खोऱ्यातील ४ तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून यामध्ये पाकिस्तानचे ४ ते ५ जवानांचा खात्मा झाल्याची माहिती मिळत आहे.
पाकव्याप्त काश्मारमधील जूरा अथमुकाम, कुंदलशाही, येथील दहशतवादी तळांना भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले. दहशतवादी भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. काल(शनिवारी) रात्रीपासून गोळीबारा सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळली आहे.
सीमेवर घडणाऱ्या घडामोडींबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच संरक्षण मंत्री घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे. यासाठी आर्टिलरी गनचा वापर करण्यात येत आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारताने पाकिस्तानातील निलम खोऱ्यातील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला आहे. निलम खोऱ्यातील ४ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच यामध्ये ४ ते ५ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठीच पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे.