नवी दिल्ली- ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे तब्बल १०६ दिवसानंतर त्यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. पी. चिदंबरम यांची १०६ दिवसांची अटक सुडबुद्धीने केलेली कारवाई होती, असे राहुल गांधी म्हणाले.
"चिदंबरम यांची अटक सुडबुद्धीने केलेली कारवाई, निर्दोष सुटतील हा विश्वास"
सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन दिल्याबद्दल मला आनंद झाला आहे. निष्पक्ष सुनावणीत ते स्वत:ला निर्दोष सिद्ध करतील याचा मला विश्वास आहे, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन दिल्याबद्दल मला आनंद झाला आहे. निष्पक्ष सुनावणीत ते स्वत:ला निर्दोष सिद्ध करतील याचा मला विश्वास आहे, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. मागील काही दिवसांपुर्वीच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी तिहार तुरुंगात जाऊन चिदंबरम यांची भेट घेतली होती. चिदंबरम यांना जामीन मिळाल्यानंतर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवरुनही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. शेवटी सत्याचाच विजय झाल्याचे ट्विट काँग्रेसने केले होते. आयएनएक्स माध्यम प्रकरणी पी. चिदंबरम यांच्यावर सीबीआय तसेच सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला आहे. २१ ऑगस्टला सीबीआयने चिदंबम यांना अटक केली होती. त्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. मात्र, त्याचवेळी ईडीनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यावर चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी जामीन दिला होता. मात्र, ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला नव्हता. त्यामुळे ते तिहार तुरुंगामध्ये होते. तब्बल १०६ दिवसानंर आता त्यांना जामीन मिळाला आहे.