नवी दिल्ली- माजी अर्थ मंत्री पी.चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने 106 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मंजूर केला; आणि बुधवारी संध्याकाळी त्यांची सुटका झाली. यानंतर आज ते काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तसेच त्यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही उपस्थिती लावली आहे.
चिदंबरम तिहार तुरूंगातून बाहेर आल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी, 106 दिवसांमध्ये आपल्या विरोधात एकही गुन्हा सिद्ध न करता आल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. यानंतर ते थेट काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील राहत्या घरी गेले. चिदंबरम यांच्या स्वागताला त्यांचा मुलगा खासदार कार्ती उपस्थित होता. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना सोडण्यात आले. याआधी संबंधित खटल्यासंदर्भात बोलण्याचे त्यांनी टाळले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आज्ञेनुसार वागणार असल्याचे त्यांनी कारागृहा बाहेर येताच सांगितले.