गांधीनगर- पंतप्रधान मोदी आज (मंगळवार) एकदिवसीय गुजरात दौऱ्यावर होते. कच्छ येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करताना शेतकरी आंदोलनावर वक्तव्य केले. दिल्लीच्या सीमेवर जमलेल्या शेतकऱ्यांची विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोप मोदींनी केला. नव्या कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी सरकार काम करत असल्याचेही यावेळी मोदी म्हणाले.
काय म्हणाले मोदी?
विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. शेतकऱ्यांच्या मागे राहून विरोधक सरकारवर हल्ला करतायेत. कृषी क्षेत्रातील या सुधारणा विरोधकांनाही करायच्या होत्या मात्र, त्यांना सत्तेत असताना ते जमले नाही. भाजपने सुधारणा करून दाखविल्या, असे मोदी म्हणाले. कच्छमधील शेतकऱ्यांच्या पंतप्रधानांनी समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्याशी चर्चा केली.
दिल्लीजवळ जमलेल्या शेतकऱ्यांची षडयंत्र आखून दिशाभूल केली जातेय. नवे कृषी कायदे लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमीनी हिसकावून घेतल्या जातील, असे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. तुम्ही दुध विकता म्हणून डेअरीवाला तुमची गाय थोडीच घेवून जातो, असे मोदी म्हणाले.
विरोध पक्ष जेव्हा सत्तेत होते, तेव्हा या कृषी सुधारणांशी ते सहमत होते. मात्र, तेव्हा त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. आता कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यास सुरुवात केली केल्याने विरोधकांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यास सुरुवात केली आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो की, माझे सरकार शेतकऱ्यांच्या शंका दूर करण्यास २४ तास तत्पर आहे, असे मोदी म्हणाले.
पंजाबमधून कच्छ जिल्ह्यात स्थायिक झालेल्या शेतकऱ्यांसोबत तेथील स्थानिक शेतकऱ्यांशी मोदींनी संवाद साधला. विविध कार्यक्रमांच्या उद्धाटनासाठी गेले असता त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असताना मोदींनी शेतकऱ्यांची भेट महत्त्वाची समजली जाते.
दिल्ली- नोयडा सीमा बंद करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा -
राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २० वा दिवस आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. दरम्यान, आज शेतकरी नेत्यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषद घेतली. कोणत्याही परिस्थिती विजय मिळवणार असल्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. तसेच उद्या दिल्ली-नोयडा सीमा पूर्णत: बंद करण्याचा इशार शेतकऱ्यांनी दिला आहे.