नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला आहे. भारतातही झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सर्व, शाळा महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग बंद आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि पालकांकडून मानव संसाधन मंत्रालयाकडे ऑनलाईन अभ्यासक्रमांची मागणी करत आहेत.
याआधी नागरिकांच्या मागणीनुसार सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने रामायण, महाभारत मालिकेचे प्रसारण सुरू केले आहे. त्यामुळे आता नागिरकांनी ऑनलाईन अभ्यासक्रमांची मागणी केली आहे. त्यामुळे घराबाहेर न पडता विद्यार्थी स्वअध्ययन करू शकतात.
काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने सर्व देशभर ऑनलाईन शिक्षण प्रणालीला चालना देण्यासाठी 'स्वयं' या प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती. या पोर्टलवर 1 हजार 900 पेक्षा विविध विषयांतील अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम आयआयटी, आयआयएम आणि केंद्रीय विद्यालयांनी बनविले आहेत. याबरोबरच केंद्र सरकारच्या नॅशनल डिजिटल लाईब्ररी वेबसाईटवर 43 हजार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. ही संख्या लॉकडाऊनच्या आधीपेक्षा दुप्पट आहे.
23 मार्च ते 27 मार्च दरम्यान 50 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे. ऑनलाईन पद्धतीने शिकण्यास मागणी असल्याने सर्व अभ्यासक्रम मोफत देण्यात आले आहेत. याबरोबरच खासगी ऑनलाईन शिकवणी नोंदणीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.