करनाल - देशात प्रत्येक ५ वर्षांनी निवडणुका होतात. आपापल्या विकासाच्या उद्देशाने जनतेकडून मतदान केले जाते. मात्र, कोणतेही सरकार आले, तरी असे काही होत नसल्याचे काही वयोवृद्ध व्यक्ती सांगत आहेत. या ज्येष्ठांनी राजकारणाचे अनेक रंग पाहिले आहेत.
ज्येष्ठांचे मत
ETV भारतची टीम हरियाणातील करनाल जिल्ह्यातील उचानी गावात पोहोचल्यानंतर तेथील ज्येष्ठांशी चर्चा करण्यात आली. हेसर्वजण ९० वर्षांपासून १११ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील आहेत. यातील अनेकांनी भारत-पाकिस्तान फाळणी पाहिली आहे. निवडणूक रॅलींमध्ये मेत्यांना मोठमोठी आश्वासने देताना पाहिले आहे. सत्तेची खुर्ची हातात येताच मतदारांना विसरून जाण्याचे सर्व नेत्यांचे एकच तंत्र असल्याचे हे वृद्ध सांगत आहेत.
विकास कोणीच केला नाही
उचानी गावातील राजा राम १११ वर्षांचे आहेत. त्यांनी पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधी, राजीव गांधी, भजनलाल, ताऊ देवीलाल, भूपेंद्र हुड्डा हे सर्व नेते पाहिले आहेत. मात्र, यांच्यातील कोणीच विकास केला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. कोणताही नेता असो, निवडणुकांनंतर खुर्ची मिळाल्यानंतर मतदारांकडे ढुंकूनही पाहात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र, 'एखादा तरी नेता येईल आणि विकास होईल' या आशेवर आम्ही आजही मतदान करत आहोत, असे राजा म्हणाले.
निवडणुकांमध्ये जनता दाखवते आरसा
काछवा गावातील चरण सिंह यांनी वयाची नव्वदी पार केली आहे. त्यांनी भारत-पाकिस्तान फाळणी, त्याआधीचे नेते आणि त्यानंतरचे २०१९ पर्यंतचे नेते पाहिले आहेत. मतासाठी नेते मोठमोठी आश्वासने देतात. नंतर विसरुनही जातात. त्यांना वाटते की, लोकही विसरून जातील. मात्र, जेव्हा ५ वर्षांनी पुन्हा निवडणुका येतात, तेव्हा जनता त्यांना आरसा दाखवते.