भुवनेश्वर - भारत सरकारच्या जीआय रेजिस्ट्रेशनकडून ओडिशाच्या रसगुल्याला मान्यता देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ओडिशा आणि पश्चिम बंगाल यांच्यात रसगुल्ल्याच्या जीआय टॅगवरुन वाद सुरू होता. या वादावर आता पडदा पडला आहे.
पश्चिम बंगालला २०१७ साली रसगुल्ल्याचा जीआय टॅग देण्यात आला होता. ओडिशाने याबद्दल आक्षेप नोंदवला होता. यामुळे जीआय रजिस्ट्रारकडून ओडिशाला याबाबत २ महिन्यांचा वेळ देताना ठोस पुरावे देण्यास सांगितले होते. ओडिशाने दिलेल्या पुराव्यानंतर, चेन्नईच्या जीआय रजिस्ट्रारकडून प्रकाशनाद्वारे रसगुल्ला ओडिशाचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. ओडिशातील प्रसिद्ध जगन्नापुरीची यात्रेचा रसगुल्ल्यासोबत प्राचीन संबंध आहेत. राज्याची परंपरा ही रसगुल्ल्यासोबत जोडलेली आहे. यामुळे रसगुल्ल्यावर ओडिशाचा हक्क असल्याचे जीआय रजिस्ट्रारकडून स्पष्ट करण्यात आले. ओडिशाचा जीआय टॅग हा २२ फेब्रुवारी २०२८ पर्यंत वैध असणार आहे.