नवी दिल्ली - मुस्लीम समाजातील तिहेरी तलाकची प्रथा अवैध ठरवणारे विधेयक लोकसभेनंतर आज राज्यसभेतही मंजूर झाले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आनंद व्यक्त केला आहे. तिहेरी तलाकच्या कालबाह्य प्रथेला केराची टोपली दाखवत लिंगसमानतेचा विजय झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी :
एका कालबाह्य प्रथेला अखेर इतिहासातील केराची टोपली दाखवण्यात आली. संसदेने तिहेरी तलाकची प्रथा बंद केली असून मुस्लीम महिलांसोबत मोठ्या काळापासून चालत आलेला अन्याय दूर करण्यात आला आहे. हा महिला सशक्तिकरणासाठी उचललेला मोठा पाऊल आहे. आज भारत आनंदोत्सव साजरा करत आहे.
गृहमंत्री अमित शाह :
आज भारतातील लोकशाहीसाठी मोठा दिवस आहे. मी पंतप्रधान मोदींनी त्यांचे वचन पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. अखेर त्यांनी तिहेरी तलाकवर बंदी आणवली. यामुळे मुस्लीम महिलांची या प्रतिगामीत्वाकडे नेणाऱ्या शापातून मुक्तता होणार आहे. या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांचे मी आभार मानतो.
केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद :
आज ऐतिहासिक दिवस आहे. दोन्ही सभागृहांनी मुस्लीम महिलांना न्याय मिळवून दिला आहे. ही भारताचा कायापालट होण्याची सुरुवात आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ :
जे लोक महिला सबलीकरणाच्या गोष्टी करत होते, त्यांनीच लोकसभा आणि राज्यसभेत मुस्लीम महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या विधेयकाला विरोध केला, हे दुर्दैव आहे. हा मुस्लीम महिलांच्या आत्मसन्माचा प्रश्न होता. या विधेयकाने तिहेरी तलाकच्या जाचक पाशात अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या मुस्लीम महिलांना प्रतिष्ठा मिळवून दिली. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सप, बसप यांचे पितळ उघडे पडले आहे.
भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा :
तिहेरी तलाकविरोधी विधेयक मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांना मनापासून शुभेच्छा. यामुळे मुस्लीम महिलांची वर्षानुवर्षांच्या शापातून मुक्तता होईल.
हा कौटुंबिक कायद्याला मोठा झटका : राज बब्बर
दरम्यान काँग्रेस नेते राज बब्बर यांनी एका नागरी कायद्याला गुन्हेगारी कायदा बनवण्यात आले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'यामुळे देशातील कौटुंबिक कायद्याला मोठा झटका बसला आहे, असे मी मानतो. ही ऐतिहासिक चूक आहे,' असे ते म्हणाले.