नवी दिल्ली -'जगातील कोणतीही शक्ती अरुणाचल प्रदेशला भारतापासून वेगळं करू शकत नाही, असा इशारा बीजू जनता दल पक्षाचे नेते आणि खासदार प्रसन्ना आचार्य यांनी चीनला दिला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांनी अरुणाचल प्रदेशबाबत केलेल्या वक्तव्याचाही आचार्य यांनी निषेध केला. 'चीनने अरुणाचल प्रदेशला कधीही मान्यता दिली नसून हा भाग दक्षिण तिबेटला भाग आहे', असा दावा लिजिन यांनी अधिकृत वक्तव्यात केला होता. त्यावर आचार्य यांनी उत्तर दिले.
ओडिशाचे लोकसभा खासदार प्रसन्ना आचार्य यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना चीनच्या वक्तव्याचा निषेध केला. ' अरुणाचल प्रदेश भारताचा भाग नाही, असे चीन वारंवार म्हणत आहे. ही एक जुनी कथा आहे. अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे जगाने मान्य केलं आहे. चीन हे सत्य का नाकारत आहे? याचं मला आश्चर्य वाटतंय', असे आचार्य म्हणाले.