देहरादून(उत्तराखंड) - केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री या चार हिंदू मंदिरांच्या प्रतिष्ठित 'चार धाम' यात्रेला यावर्षी कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र मंदिराच्या पूजेच्या परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे. भाविकांशिवाय या मंदिरांमध्ये पारंपरिक विधी आणि पूजा करण्याला सरकारने परवानगी दिली आहे.
सरकारने मंत्रोच्चार, प्रार्थना, आरती यासह धार्मिक पूजा आणि अभिषेक करण्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑडिओच्या माध्यमातून भाविकांना ते ऑनलाईन उपलब्ध करुन दिले जाईल. या ऑनलाईन पूजेसाठी भाविक ऑनलाइन देणगी व नैवेद्य देखील देऊ शकतील.
केदारनाथ धाममधील महाभिषेकाचे शुल्क ८ हजार रुपये, रुद्राभिषेक साडेसात हजार रुपये, लहान रुद्राभिषेक सहा हजार रुपये आणि सौंदसपचाराचे शुल्क चार हजार आहे. तर बद्रीनाथ धाम येथे महाभिषेकाचे शुल्क साडेचार हजार रुपये आहे.