द हेग - कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या दरम्यान भारतीय शिष्टमंडळाने पाकिस्तानी प्रतिनिधींसोबत हस्तांदोलन करण्यास नकार देत हात जोडून नमस्कार करण्यास पसंती दर्शविली. या कृतीतून पाकला कडक संदेश दिला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पाकिस्तानी अॅटर्नी जनरल अन्वर मन्सूर खान हे भारतीय शिष्टमंडळासमोर हात पुढे करत त्यांना हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, भारतीय प्रतिनिधी दीपक मित्तल त्यांना हात जोडत नमस्कार करत आहेत.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४६ जवानांना वीरमरण आले होते. हा हल्ला पाकिस्तानी जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. या संघटनेनेच या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यानंतर भारताने पाकसोबतची वागणूक बदलली असल्याचीही चर्चा होत आहे.
दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणी वकील हरिष साळवे यांनी पाकिस्तानवर आरोप केले आहेत. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले असल्याचे साळवे यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने जाधव प्रकरणात घेतलेली सुनावणी पूर्णत: अयशस्वी असल्याचेही साळवे यांनी म्हटले आहे.