पाटणा -अखेर बिहारमध्ये पुन्हा नितीशराज आले आहे. आज नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा राजधानी पाटण्यातील राजभवनात पार पडला. यावेळी राज्यपाल फागू चौहान यांनी नितिश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तर भारतीय जनता पक्षाचे नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा दुपारी चारच्या सुमारास झाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंग यासारख्या मूलभूत प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.
जेडीयू नेते विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी आणि मेवा लाल चौधरी यांनी बिहारच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. हिंदुस्तानी आम मोर्चाचे (एचएएम) प्रमुख जीतन मांझी यांचे पुत्र संतोषकुमार सुमन आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) चे मुकेश सहनी यांनीही बिहारचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर भारतीय जनता पक्षाचे नेते मंगल पांडे आणि अमरेंद्र प्रताप सिंह यांनी बिहारचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
नंद किशोर यादव यांना विधानसभा अध्यक्ष बनवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. तर राष्ट्रीय जनता दलाने शपथविधीवर बहिष्कार टाकला. राजदचे नेते तेजस्वी यादव शपथ सोहळ्याला उपस्थित राहिले नाही.