नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भाजप खासदार रमादेवी यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
कोण काय म्हणाले...
'आझम खान महिलांचा आदर करत नाहीत. मला माहीत आहे. त्यांनी जया प्रदा यांच्याविषयी काय वक्तव्य केले होते', त्यांना सभागृहात राहण्याचा काही अधिकार नाही, त्यांना निलंबित करायला हवे, असे रमादेवी म्हणाल्या आहेत.
गुरुवारी लोकसभेत जे घडले त्या प्रकरणी सर्व जण एकत्र आवाज उठवत आहेत. हे प्रेरणादायी आहे, असे अर्थमंत्री निर्माला सीतारमन यांनी म्हटले आहे.
महिलांचा अपमान करणाऱ्यांचा काँग्रेस पक्षाने नेहमीच विरोध केला आहे. लोकसभेत आतापर्यंत बऱ्याच घटना या महिलांचा अपमान करणाऱ्या घडल्या आहेत. यापुर्वी सोनिया गांधी यांना 'इटलीची कठपुतळी' असे म्हणत त्यांचा अपमान केला होता, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले.
'आझम खान यांनी माफी मागावी नाहीतर त्यांना निलंबित करावे ' अशी मागणी केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी सभागृहात केली आहे.
गुरुवारी लोकसभेत जे घडले ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. याच लोकसभेत महिलांची कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळवणूकविरोधात विधेयक पास करण्यात आले होते. याप्रकरणी सर्वांनी एकत्र आवाज उठवावा अशी मी सर्वांना विनंती करते. तुम्ही एका महिलेशी अशा प्रकारचे गैरवर्तन करु शकत नाही, असे स्मृती इराणी म्हणाल्या.
काय प्रकरण ?
गुरुवारी लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना त्यांनी लोकसभा अध्यक्ष रमादेवी यांच्यावर शायरीमध्ये वादग्रस्त टिप्पणी केली होती. सत्ताधारी पक्षाने गदारोळ करत त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. यावर तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात असे खान म्हणाले. जर मी सभेच्या कार्यवाहीमध्ये चुकीचे काही बोललो असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे म्हणूण माफी न मागता ते सदन सोडून निघून गेल होते.
यापूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ७२ तासांच्या प्रचारबंदीची कारवाई केली होती. तर नुकतचं मदरशांमध्ये गोडसे आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यासारख्या व्यक्ती तयार होत नाहीत, अशी वादग्रस्त टिप्पणीही त्यांनी केली होती.