नवी दिल्ली -निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेश कुमार याने फाशी टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्याने भारत सरकार, दिल्ली सरकार आणि अॅमिकस क्यूरी (न्यायालयीन सल्लागार) यांच्यावर आपल्याविरोधात कट रचल्याचा आरोप केला आहे. आपण यांच्या कारस्थानाचे बळी ठरल्याचे त्याने म्हटले आहे.
निर्भयाचा गुन्हेगार मुकेश कुमार याने शुक्रवारी ही याचिका दाखल करत आपल्याला सर्व कायदेशीर उपायांचा वापर करण्याची मुभा मागितली. या याचिकेत मुकेश याने स्वतःच्याच जुन्या वकिलांवर आपली दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. क्यूरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला जातो, या बाबीची माहिती वकिलांनी आपल्याला दिली नसल्याचे त्याने म्हटले आहे. अशा स्थितीत आपल्याला क्यूरेटिव्ह पिटीशन आणि अन्य कायदेशीर मार्गांचा वापर करू दिला जावा, असे मुकेश कुमार याने म्हटले आहे. या वेळी, आपले वकील एम. एल. शर्मा यांच्या माध्यमातून मुकेशने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
दिल्लीच्या न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी चारही गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्याचा आदेश दिला आहे. 20 मार्चला (शुक्रवार) सकाळी साडेपाच वाजता या सर्वांना मृत्यूदंड देण्यात येणार आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर निर्भयाच्या आईने पत्रकारांशी संवाद साधला. '20 मार्चला आमच्या जीवनात नवी पहाट येईल,' असे त्यांनी म्हटले आहे. 20 मार्च ही फाशीची अंतिम तारिख असेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच, संधी मिळाल्यास आपण त्या गुन्हेगारांना मरताना स्वतः पाहू इच्छित असल्याचे त्यांनी म्हटले.