नवी दिल्ली - हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील ४ आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी चकमकीत ठार केले. आरोपींनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता गोळीबारात आरोपी ठार झाल्याचे सायबराबादचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. मात्र, या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चौकशी सुरू केली आहे. ७ सदस्यीय मानवाधिकार आयोगाचे पथकाने चकमक झाली तेथील घटनास्थळाला भेट दिली.
मानवधिकार आयोगाची घटनास्थळाला भेट हेही वाचा -हैदराबाद बलात्कार पीडितीचे वडील म्हणतात...'त्यांचा' तर जीव गेला आणि समाजातील मान सन्मानही
हैदराबाद पोलिसांनी केलेली ही चकमक वादात सापडली आहे. अनेकांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. मानवाधिकार आयोगाने कालच याप्रकरणी चौकशी पथक पाठवणार असल्याचे जाहीर केले होते. मानवाधिकार आयोग तपासाबाबत पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल तयार करणार आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी उल्लंघन केले आहे का? याची तपासणी करणार आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन कशा प्रकारे करण्यात आले याचीही पाहणी आणि चौकशी केली. तसेच चट्टनपल्ली येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी तपास करतेवेळी नियमांचे पालन केले का? यामध्ये काही त्रुटी आहेत का? याचा तपास मानवाधिकार आयोगाचे पथक करणार आहे.
हेही वाचा -न्यायानं कधी बदल्याची जागा घेऊ नये - सरन्यायाधीश
मृतांचा शवविच्छेदन अहवाल मानवाधिकार आयोगाने तपासल्याचे गांधी रुग्णालयातील न्यायवैद्यकीय पथकाचे अधिकारी कृपाल सिंग यांनी सांगितले. नियमावलीनुसार शवविच्छेदन करण्यात आले की नाही, याची चौकशी तपास पथकाने केली. ३ दिवसांमध्ये शवविच्छेदनाचा अहवाल पूर्णपणे तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर तो उच्च न्यायालय किंवा मानवाधिकार आयोगाला सुपूर्त करण्यात येईल, असे सिंग यांनी सांगितले.