हैदराबाद - दिल्लीत सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे कधीही म्हणोल नाही, आताही म्हणत नाही, असे अमित शाह म्हणाले. हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी शहरात आले असता त्यांनी हे वक्तव्य केले. राजधानी दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. शेतकऱ्यांनी दिल्ली घेराव घालण्याची घोषणा केली असून आंदोलक शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
काय म्हणाले अमित शाह ?
शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे वक्तव्य मी कधीही केले नाही आणि आताही मी असे म्हणत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा हक्क आहे. केंद्राने पास केलेले तीनही कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. राजकीय दृष्टीने प्रेरित झालेले विरोधक या कायद्यांच्या विरोधात जाऊ शकतात, असे ते म्हणाले.
सरकार चर्चा करण्यास तयार
३ डिसेंबरच्या आधी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे, असे वक्तव्य अमित शाह यांनी शनिवारी केले होते. आंदोलकांनी बुरारी येथील निरंकारी मैदानावर जावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र, शेतकरी जंतरमंतरवर आंदोलन करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे केंद्रापुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची प्रत्येक अडचण सोडविण्यासाठी सरकार तयार असल्याचा पुनरुच्चारही शाह यांनी शनिवारी केला.